मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या भव्य मोर्चाने शहर दणाणले

अंबाजोगाई : पोलीसनामा आॅनलाईन – सन 2013 ते 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सातत्याने विविध आंदोलने,मोर्चे काढण्यात आली तसेच निवेदनेही देण्यात आली. परंतु, शासन गोर-गरीबांच्या जीवन जगण्याच्या मागण्यांबाबत उदासिन आहे. प्रशासनाला गोर-गरीबांविषयी कोणतेही कणव किंवा जाणिव राहिलेली नाही.या प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लढा दिला जात आहे. याच लढ्याचा एक भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गुरूवार,दि.1 नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालयावर शेतमजूर व कष्टकरी जनतेचा भव्य मोर्चा काढला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केले.यावेळी उपजिल्हाधिकारी यांना तहसीलदार अंबाजोगाई यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अन्न सुरक्षा, केरोसीन व सणावाराचे सामान गोर-गरीबांना वेळेवर मिळत नाही. शहरी भागातील झोपडपट्टया व गरीबांच्या वस्त्या यांना सरसकट अन्न सुरक्षेत घेण्याची आमची जुनी मागणी आहे. परंतु, महसूल प्रशासन गरीबांच्या जीवनाकडे गंभीरपणे पाहत नाही. उलट त्यांचे वैयक्तिक हितसंबंध, सरकारी जमीनीचे खाजगी व्यवहार रेती व धान्याचा काळा बाजार यात गुंतलेले आहेत. त्यामुळे ते लोकहिताची कामे करू शकत नाहीत. त्यामुळे उपजिल्हाधिकारी यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या निवेदनातील पुढील मागण्या मान्य कराव्यात.’

जाहिरात

1) शहरी झोपडपट्यांमध्ये सर्व्हे करून जॉबकार्ड वाटप करा.
2) सर्व गोर-गरीबांना सरसकट अन्न सुरक्षा लागु करा.
3) शेतमजुरांच्या सुशिक्षित मुला-मुलींना जिल्हा उद्योग केंद्राकडून कमीत कमी दोन लाखाचे अर्थसहाय्य उद्योगासाठी द्या.
4) शिकलकरी समाजास स्वतःच्या घरासाठी सरकारी जमीनी उपलब्ध करा,
5) श्री.धोंगडे व श्री.लोखंडे यांच्या उचलबांगडी प्रकरणी अंबाजोगाईच्या तहसीलदारांची चौकशी करून कारवाई करा.
6) सरकारी जमिनी, गायरान, वाळु, मुरूम  माफिया अाणि महसूल प्रशासन यांचे हितसंबंध तोडून सर्व्हे नंबर 17 व चनईचे गायरान अतिक्रमीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करा.
7) महाराष्ट्रातील व देशातील लोकशाहीवादी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या खोट्या पोलिस केस किंवा गुन्हे मागे घ्या.

विशेष म्हणजे वरील सर्व मागण्या बाबत आठ दिवसात कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर कॉ.बब्रुवाहन पोटभरे, कॉ.बाबासाहेब सरवदे, आशाबाई जोगदंड, मिरा पाचपिंडे,सविता गायसमुद्रे,दिपमाला सरवदे,छाया तरकसे, जयश्री जोगदंड,मिरा जोगदंड,रंजना जोगदंड, विजयादशमी पाचपिंडे, छाया गायकवाड, पंचशिला कांबळे, वैशाली मस्के, अजिजा शेख, कविता कांबळे, अलका जोगदंड आदींसहीत महिला कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

जाहिरात