थेऊर येथील वाळूच्या साठ्यावर भरारी पथकाची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब हरकत घेत महसूल विभागातील अधिकारी वर्गास कारवाईचे आदेश दिले. परंतु यावरही हा वाळू उपसा थांबत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी एक शिघ्र कृती दल तयार करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.

हवेली तालुक्यातील मुळा मुठा नदीतून बेसुमार वाळू उपसा होत असताना महसूल विभागातील अधिकारी काय व कधी कारवाई करणार हे औत्सुक्याचे होते. परंतु जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुचना केल्यावर कृती दलाने दौंड तालुक्यातील काही ठिकाणी वाळू उपशावर कारवाई केल्यानंतर त्यांना हवेली तालुक्यातील थेऊर परिसरात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची खबर लागली त्यावर या पथकाने मुळा मुठा नदीच्या परिसरात तपासणी केली असता नदीतून वाळू उपसा करुन तो येथील गट क्र.730 अ तसेच 730 ब मध्ये साठा केल्याचे दिसून आले. परंतु तेथे वाळू उपसा करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नव्हती. यावर थेऊरच्या मंडल अधिकारी गौरी तेलंग यांना याची माहिती देऊन पंचनामा करण्यासाठी सुचवले.

मंडल अधिकारी यांनी याठिकाणी पंचासह जाऊन पंचनामा केला त्यात गट क्र.730 अ व ब मध्ये अंदाजे पाच ब्रास वाळू साठवलेली आढळून आली असे नमुद केले आहे. यावर महसूल काय कारवाई करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण नदीतून बेसुमार वाळू उपसा झालेला आहे आणि गेली अनेक वर्षे येथे वाळूचे लिलाव झालेले नाहीत.