…म्हणून मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर वाढदिवस साजरा करणार नाही

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय संघाचा माजी धडाकेबाज खेळाडू मास्टर ब्लॉस्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा उद्या वाढदिवस असून तो वयाची 46 वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र यंदा कोरोनामुळे वाढदिवसाला कुठलेही सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. यंदा देशात कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या खडतर काळात कोरोनाशी लढणार्‍या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचार्‍यांसाठी यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही, अशी माहिती सचिनच्या जवळच्या मित्राने दिली आहे.

देशात कोरोनाचे थैमान सुरु असून ’ही वेळ सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी कोरोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत, अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे सचिनने ठरवले आहे, अशी माहिती सचिनच्या मित्राने दिली आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यात सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहायता निधीला 50 लाखांची मदत केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंशी संवाद साधला होता.

त्यावेळी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे मदत करू असा विश्वास त्याने मोदींना दिला होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच घरात बसून आहेत. या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामेही खोळंबली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सरकार आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. नुकतेच सचिनने कात्री घेत स्वतःचेच केस कापले असल्याचे मजेशीर फोटो आपल्या इस्टाग्रामवर शेअर केले होते.