Loksabha 2019 : बीडमध्ये रंगणार मुंडे Vs मुंडे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विद्यामान खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांना टक्कर देण्यासाठी त्यांच्या विरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची मागणी केली जात आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंरतु धनंजय मुंडे यांनी याबाबत कुठलेही क्तव्य केलेले नाही. तरीही त्यांचा नावाचा विचार होऊ शकतो असेही सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, बीडमध्ये भाजपाच्या प्रितम मुंडे यांना टक्कर देण्याासाठी मुंडे कुटुंबातील कोणीतरी असावे असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. राजश्री मुंडे या सामाजिक कामात आघाडीवर आहेत. त्यांचा राजकारणाशी थेट संबंध नसला तरी जिल्हा परिषद व अन्य निवडणुकींमध्ये त्या पक्षाचा प्रचारासाठी उतरत असतात. मुख्य म्हणजे राजश्री मुंडे या परळी डेअरी, संत जगमित्रनागा सूतगिरणी यासारख्या अन्य काही कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत.

मुख्य म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत धनंजय मुंडे यांच्या बी-४ बंगल्यावर बैठक सुरु आहे असेही समजत आहे. या बैठकीत सुरुवातीला बीडच्या उमेदवाराबद्दल निर्णय होणार आहे. यानंतर अन्य जागांचा विचार केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नाही तर, राष्ट्रवादीचे बहुतांश उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी राजश्री मुंडे यांचं नाव जरी पुढे केले असले तरी नंजय मुंडे यांनी मात्र त्याला सहमती दिलेली नाही, असे समजत आहे. या बैठकीला अजित पवार, दिलीप वळसे पाटील हे उपस्थित आहे. याशिवाय बीडचे प्रमुख पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत.