80 वर्षांच्या आई-वडिलाचा खून करून पलायन करणाऱ्या 40 वर्षीय मुलाच्या अपघातात उडाल्या ‘चिंधड्या’

भदाणा (राजस्थान) : सकाळी सकाळी महामार्गावर एका अज्ञात वाहनांची धडक बसून दुचाकीवरुन जाणार्‍या एका तरुणाचा मृत्यु झाला. पोलीस या अपघाताची खबर त्याच्या घरी देण्यासाठी पोहचले तर, त्यांच्यासमोर वेगळेच दृश्य दिसून आले. ज्या मुलाच्या अपघाती मृत्युची खबर ते देणार होते, तो मुलगाच आपल्या वृद्ध आई वडिलांची हत्या करुन पळून गेला असल्याचे दिसून आले.

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील भदाणा गावात ही घटना बुधवारी घडली होती. पोलिसांनी सांगितले की, भदाणा गावाजवळील डेगाना महामार्गावर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यु झाला होता. हनुमानराम (वय ४०, रा. भदाणा) असे या दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस या हनुमानराम याच्या घरी गेले. त्यावेळी त्याचे वडिल रुघाराम (वय ८०) आणि पतासीदेवी (वय ८०) यांचा कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

हनुमानरामच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, हनुमानरामाने आपले आईवडिल गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात आणि मानेवर वार करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर तो दुचाकीवरुन पळून जाऊ लागला. त्याला पत्नीने रोखण्याचा प्रयत्न केला. पण, तो तिला न जुमानता निघून गेला. एका बाजूला सासु सासरे यांचा खुन झालेला दुसरीकडे पतीचा अपघाती मृत्यु झाल्याचे समजल्यावर हनुमानराम याच्या पत्नीवर आकाशच कोसळल्यासारखे झाले होते. जमिनीच्या वादातून हनुमानराम याने आपल्या आईवडिलांची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.