Coronavirus : मथुरेत ‘कोरोना’ व्हायरसच्या संशयित रूग्णाचा मृत्यू, डॉक्टरांनी ‘एम्स’मध्ये जाण्यास सांगितले होते

मथुरा : वृत्त संस्था – उत्तर प्रदेशच्या मथुरात खोकल्याने ग्रस्त असलेल्य तरूणीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरने रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरसच्या लक्षणांचा उल्लेख करून तिला पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रूग्णालयात पाठवले होते.

कोरोना व्हायरसने तरूणीचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच शहरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. डॉक्टरांनी रेफर केल्यानंतर तरूणीचे नातेवाईक तिला दिल्लीला घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच तिचा मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे?

रामकृष्ण मिशन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तरूणीच्या तपासणीनंतर रिपोर्टमध्ये लिहिले की, तिला सात दिवसांपासून खोकला होता आणि एक दिवसापूर्वी पोटात वेदना होऊ लागल्याने तिला अत्यावस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरूणीचा रक्तदाब नोंदवता येत नव्हता. तिच्या रिपोर्टमध्ये कारोना व्हायरसचा उल्लेख आहे.

तरूणीच्या कुटुंबियांनी काय सांगितले?

तरूणीचा नातेवाईक कपिल याने सांगितले की, काल अचानक तिची प्रकृती बिघडली. अति खोकल्यामुळे तिला उलटी झाली होती. घाबरलेले कुटुंबिय तिला एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये नेत होते. मथुरातील सर्वात मोठे हॉस्पिटल असलेल्या रामकृष्ण मिशनमध्ये डॉक्टरांनी तिला कोरोना व्हायरसचा संशयित रूग्ण असल्याचा अंदाज वर्तवून दिल्लीतील एम्ससाठी रेफर केले.

यादरम्यान तरूणीची प्रकृती गंभीर होत गेली आणि तिचा मृत्यू झाला. या मृत्यू बाबत अद्याप कोणत्याही जबाबदार आरोग्य अधिकार्‍याने प्रतिक्रिया दिलेली नाही.