मथुरेतील बाके बिहारी मंदिरात हजारोंच्या उपस्थितीत रंगलीय होळी; कोरोनाच्या सावटाकडे ‘दुर्लक्ष’

मथुरा : वृंदावनमधील बाके बिहारी मंदिरातील होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने उत्तर प्रदेश सरकारने नियमांचे पालन करुन होळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. परंतु, त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

वृृंदावनमध्ये होळी हा फक्त एक सामान्य सण नसतो. हा भगवान श्रीकृष्णाचा उत्सव आणि या ठिकाणाचा जवळचा संबंध आहे. बांकेबिहारी मंदिरात होळीची परंपरा प्राचीन काळापासून आहे. होळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण येथे येऊन बसतात आणि त्यांचे भक्त होळी खेळताना पाहतात. पण ते स्वत: उत्सवात सहभागी होत नाही.

बांके बिहारी मंदिराची प्रथा म्हणजे येथे एक दिवस आधी होळी साजरी होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी लोक शहरभर होळी खेळतात. या प्रथेनुसार रविवारी बांके बिहारी मंदिरात हजारो लोकांच्या उपस्थितीत होळी साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. होळी साजरी करण्यासाठी सहभागी झालेल्यांनी मास्कचा वापर केलेला दिसून येत नव्हता. तसेच मंदिरात इतकी प्रचंड गर्दी झाली होती की पाय ठेवायला जागा नव्हती. शेवटी तेथील स्वयंसेवकांनी लोकांना हाताला धरुन बाजूला करायला सुरुवात केली तरीही, गर्दी कमी होताना दिसत नव्हती.

उत्तर प्रदेशातील मथुरा, वृंदावन, गोवर्धन, नंदनगर, बनारस येथे आज मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यास मनाई करण्यात आली. त्याचप्रमाणे ओडिशा सरकारनेही सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर बंदी आणली आहे. मध्य प्रदेशापासून आसामपर्यंत सर्वत्र मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येत आहे.