रेल्वेत दारूड्यांच्या पार्टीमुळं लोकसभा अध्यक्ष झाले ‘हैराण-परेशान’, ‘त्या’ 5 जणांचं पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली ते इंदूरकडे जाणाऱ्या इंदूर इंटरसिटी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये प्रवास करणारे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना बाजूला सुरु असलेल्या दारू पार्टीला थांबवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. रविवारी रात्री लोकसभा स्पीकर रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या पुढच्या डब्यात काही इतर तरुणही प्रवास करत होते. नवी दिल्लीहून ट्रेन सुटताच या सर्व तरुणांनी दारू पिण्यास सुरुवात केली. यानंतर गोंधळ सुरू झाला.

एवढेच नाही तर तरुणांना दारू पिणे थांबवण्यासाठी ओम बिरला यांचे पी.ए. राघवेंद्र गेले तेव्हा दारू पिलेल्या तरुणांनी त्यांच्या सोबतही हातापायी केली. यानंतर लोकसभा अध्यक्षांना पोलिसांना बोलवावे लागले. रात्री एकच्या सुमारास जेव्हा ट्रेन मथुरा जंक्शनला पोहोचली तेव्हा आरपीएफ आणि जीआरपीने आरोपी तरुणांना अटक केली.

पाचही दारू पिणाऱ्या तरुणांवर केली कारवाई
रात्री १.१० वाजता जेव्हा ट्रेन मथुरा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर पोहोचली, तेव्हा तेथे उपस्थित आरपीएफ, जीआरपीने बिरला यांच्या शेजारी असलेल्या डब्यातील दारूच्या नशेत बसलेल्या पाच तरुणांना पकडले आणि त्यांना अटक केली. रेल्वेच्या त्या डब्यातून आरपीएफने दारूच्या बाटल्या, स्नॅक्स, आणि कोल्ड्रिंक जप्त केले. आरपीएफने अटक केलेल्या तरुणांना न्यायालयात हजर केले आहे. आरपीएफचे प्रभारी सीबी प्रसाद यांनी सांगितले की, या पाच तरुणांवर ट्रेनमध्ये मद्यपान करण्याच्या कलमा अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.