श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी 30 सप्टेंबरला सुनावणी ! शाही ईदगाह हटवण्याची मागणी

मथुरा : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम जन्मभूमीनंतर आता भगवान श्रीकृष्ण जन्मभूमीला लागून असलेला शाही ईदगाह हटवण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. यासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग छाया शर्मा यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ही तारीख निश्चित केली आहे.

श्रीकृष्ण विराजमान, स्थान श्रीकृष्ण जन्मभूमी आणि उक्त लोकांनी ही याचिका दाखल केली आहे. यात असं म्हटलं आहे की, 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ (आताचे श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान) आणि शाही ईदगाह यांच्यात जमिनीसंदर्भात करार झाला होता. यात ईदगाह जेवढ्या जागेवर बांधण्यात आला आहे तेवढ्या जागेवर तसाच राहिल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह प्रशासन यांच्यात 5 दशकांपूर्वी झालेला करार अवैध असून तो निरस्त करण्यात यावा आणि ईदगाह हटवून संपूर्ण जमीन मंदिर ट्रस्टला देण्यात यावी अशी मागणी भक्तांच्या वतीनं करण्यात आली आहे.

वकिल विष्णु शंकर जैन यांनी शुक्रवारी मथुरा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की, 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह प्रशासन यांच्यात झालेला करार पूर्णपणे चुकीचा आहे. याशिवाय तो भगवान श्रीकष्ण आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छेविरुद्ध आहे. तो निरस्त करण्यात यावा आणि मंदिर परिसरातील ईदगाह हटवून ती जमीन मंदिर ट्रस्टला देण्यात यावी.

लखनऊ येथील रंजना अग्निहोत्री आणि त्रिपुरारी त्रिपाठी, सिद्धार्थ नगरचे राजेश मणी त्रिपाठी आणि दिल्ली येथील प्रवेश कुमार, करुणेश कुमार शुक्ला आणि शिवाजी सिंह यांनी शुक्रवारी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरात बांधण्यात आलेल्या शाही ईदहगाहला जमीन देणं चूक आहे असं म्हणत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग छाया शर्मा यांच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.