मावळमध्ये होणार अटीतटीचा सामना, बाळा भेगडेंसमोर सुनिल शेळकेंचे कडवे ‘आव्हान’

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार बाळा भेगडे यांना पक्षाने मावळमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्य़कर्ते आणि माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीने आपल्या गोटात घेऊन मावळची उमेदवारी दिली. सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन बाळा भेगडे यांच्यासमोर तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे बाळा भेगडे हॅट्रीक साधणार का याकडे संपूर्ण मावळ आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपने आजपर्य़ंत कोणत्याही उमेदवाराला मावळमधून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नगरसेवक सुनिल शेळके हे इच्छूक होते. दरम्यानच्या काळात झालेल्या वादामुळे सुनिल शेळके हे नाराज झाले होते. तसेच त्यांनी आमदार बाळा भेगडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजप पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा सुनिल शेळके यांना होती. मात्र, आयत्यावेळी भाजपने बाळा भेगडे यांना पुन्हा उमेदवारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनिल शेळके यांना उमेदवारी जाहीर करून बाळा भेगडे यांना तगडे आव्हान दिल्याने या ठिकाणची लढत चुरशीची होणार आहे. बाळा भेगडे यांना राज्यमंत्री पद दिले त्यामुळे पुन्हा त्यांनी उमेदवारीची आशा धरुनये असे शेळके समर्थकांचे म्हणणे होते. तर मंत्रीपदामुळे उमेदवारी नक्की झाल्याचा भेगडे समर्थकांनी प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, भाजपने तिकीट नाकारले तर शिवसेना हा पर्य़ाय शेळके यांच्यापुढे होता. त्यासाठी त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी सलगी वाढवली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कातंत्र वापरून सुनिल शेळके यांना उमेदवारी देऊन भाजपला धक्का दिला. मागच्या निवडणुकीत सुनिल शेळके यांनी बाळा भेगडे यांचे काम केले होते. त्यावेळी चांगल्या मताधिक्याने बाळा भेगडे दुसऱ्यांदा निवडून आले होते. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभव स्विकारावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेब नेवाळे हे राष्ट्रवादीकडून इच्छूक होते. पक्षाने आयारामांना उमेदवारी दिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल असे नेवाळे यांनी सुनावत बंडाचे निशाण उपसले आहे.

Visit : Policenama.com