मावळ मतदारसंघात पार्थ पवार शिवसेनेची हॅटट्रिक रोखणार ?

पिंपरी चिंचवड :  पोलीसनामा ऑनलाईन – मावळ मतदारसंघात या वर्षी तिसरी लोकसभा निवडणूक पार पडते आहे. २००९ आणि २०१४ साली मतदारसंघात शिवसेनेचा धनुष्यबाण लोकांच्या सर्वाधिक पसंतीला पडला आहे. शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी मावळचे पहिले खासदार म्हणून लोकसभेत या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर २०१४ साली श्रीरंग बारणे यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. मागील दोन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवाराने या ठिकाणी निवडणूक लढवली नसली तरी या वेळी मात्र अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पिंपरी चिंचवडमधील निर्धार परिवर्तन यात्रेत शरद पवार आणि अजित पवार तुमच्यासाठी झिजले आहेत आता त्यांच्यासाठी तुम्ही काही तरी देण्याची वेळ आली आहे असे म्हणत तुम्हाला पवार कुटुंबाला काही द्यायचेच असेल तर आशीर्वाद द्या असे हात जोडून आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले होते.

मावळ लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचा कार्यक्रम असल्यास त्या मंचावर पार्थ पवार यांची हजेरी ठळकपणे लोकांना दिसू लागली आहे. आजोबा शरद पवार यांना शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्सवर तसेच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्सवर पार्थ पवार याचे छायाचित्र आता मावळ भागात झळकू लागले आहे. एकामागे एक घडणारी घडामोड पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब करू लागली आहे.

शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या समोर तगडे आव्हान उभे राहिल्यामुळे त्यांचा लोकसभेचा मार्ग सुखकर राहिला नाही. त्याच प्रमाणे लक्ष्मण जगताप हे श्रीरंग बारणे यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी पवारांना उघड अथवा गुप्त मदत करू शकतात. तर पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादीत हि गटातटाचे राजकारण भलतेच फोफावले आहे. त्याचाच दुष्परिणाम म्हणून मागील काही निवडणुकात राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. आता आगामी लोकसभेला हे गटतट खलाशी बुडवण्यासाठी शरद पवार यांनी पवार कुटुंबीया मधील उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे.

शिवसेना या मतदारसंघात हॅटट्रिक करण्याच्या इराद्यात असतानाच राष्ट्रवादीने पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा बॉम्ब टाकल्याने राजकीय वर्तुळात या मुद्दयांवर मोठीच शांतात पसरली आहे. शिवसेना यावेळी हॅटट्रिक करणार का ? कि राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पराभूत होणार ? या प्रश्नांची उत्तरे फक्त येणारा काळच देऊ शकतो.