पवार परिवारातील पहिला पराभव करण्याची संधी मावळकरांना : बारणे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मावळच्या मावळ्यांनी पवार यांच्या पैशांना थारा न देता त्यांना त्यांची जागा दाखवली. विकासाच्या पाठीमागे उभा राहून जनतेने अचूक वेध घेत बाणाचा निशाणा मतांच्या द्वारे साधत पवार घराण्याचा पहिला पराभव केला, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विजयानंतर दिली.

बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष देशाच्या संसदेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेशी जोडून काम केले. संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून जनतेचे प्रतिनिधित्व करत असताना संसदेत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली, बारणे म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील माझा विजय उद्धव ठाकरे,भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्याचा हा विजय आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या पैशाचा पराभव झालेला आहे. विकासाला जनतेने प्राधान्य दिले असून अजित पवार यांच्या पुत्राची उमेदवारी लादल्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी होती. ती जनतेने मतदानातून जाहीर केली आहे, असेही ते म्हणाले.

मावळ मतदारसंघात अजित पवार ठाण मांडून होते. पवार परिवार संपूर्ण ठाण मांडून होता. आयुष्यामध्ये अजित पवारांनी जेवढे फोन केलेले नसतील, तेवढे निवडणुकीच्या कालावधीमध्ये फोन केले होते. बारामतीतून जेवढी फौज आली तेवढी निष्कामी ठरली. त्यांना माहिती नव्हते मावळ हा प्रांत छत्रपती शिवरायांचा प्रांत आहे. राष्ट्रवादी विधानसभेला राहणार नाही. मावळातील प्रश्न सोडविण्यासाठी या भागाचा प्रतिनिधी म्हणून आटोकाट प्रयत्न करेल. निश्चितपणे काही प्रश्न सुटले आहेत. काही प्रश्न बाकी आहेत. प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेऊनच या निवडणुकीत उतरलो आहे, असेही ते म्हणाले.

मला मतदारांचा अंदाज आला होता. मतदाराने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. त्यामुळे लाखोंच्या फरकाने मी विजयी होणार असा विश्वास मला सुरुवातीपासून होता. भ्रष्टाचाराचा पैसा मतदारांनी नाकारला होता आणि विकासाला मत दिले होते. देशामध्ये नरेंद्र मोदींचा झंझावात सर्व मतदारापर्यंत जाणवत होता. म्हणून गेल्या पाच वर्षांमध्ये देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारने केलेले काम मतदारांना भावले होते. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. मावळच्या जनतेने दोन्ही पक्षांचा दारुण पराभव केला आहे, असेही बारणे म्हणाले.