देशातील सरकारी शाळांमध्ये 10 लाख शिक्षकांची पदे रिक्त, ‘हे’ राज्य पहिल्या स्थानी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील सरकारी शाळांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांची पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात 10 लाख 60 हजार 139 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी लोकसभेत ही माहिती दिली. सन 2020-21 पर्यंत संपूर्ण देशात शिक्षकांची 61 लाख 84 हजार 464 पदे मंजूर आहेत, तर विविध राज्यात एकूण 10 लाख 60 हजार 139 पदे रिक्त आहेत. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेश अव्वल स्थानी आहे.

लोकसभेत खासदार धर्मवीर सिंह यांनी शिक्षणमंत्री निशंक यांना अतारांकित प्रश्न विचारला होता की संपूर्ण देशभरात शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत आणि त्यांची राज्य-वार विशेषत: हरियाणाच्या संदर्भात कधीपर्यंत भरली जाण्याची शक्यता आहे?

यास उत्तर देताना शिक्षणमंत्री म्हणाले की शिक्षकांची भरती ही एक सतत प्रक्रिया असून सेवानिवृत्तीमुळे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे उत्पन्न झालेल्या अतिरिक्त गरजांमुळे पदे रिक्त होत असतात. शिक्षण राज्यघटनेच्या समवर्ती यादीत आहे. शिक्षक भरती, सेवा अटी आणि शिक्षक तैनाती संबंधित राज्य/ केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या अखत्यारीत आहेत. तथापि शिक्षण मंत्रालय सल्लामसलत किंवा आढावा बैठकीद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी आणि त्यांची नेमणूक करण्यासाठी विनंती करत राहते. शिक्षणमंत्र्यांनी माहिती दिली की सध्या हरियाणामध्ये 10,349 पदे रिक्त आहेत आणि मंजूर पदांची संख्या 106,263 आहे.

आपल्या लेखी उत्तरात शिक्षणमंत्र्यांनी राज्यानुसार रिक्त आकडेवारी दिली असून त्यामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश अव्वल आहेत. बिहारमध्ये सध्या 275,255 पदे आणि उत्तर प्रदेशात 217,481 पदे रिक्त आहेत. तथापि, बिहारमध्ये मंजूर पदांची संख्या 688,157 आहे तर यूपीमध्ये शिक्षकांच्या मंजूर पदांची संख्या 752,839 आहे. इतरही अशी अनेक राज्ये आहेत जिथे शिक्षकांची मोठी कमतरता आहे. यामध्ये आंध्र प्रदेश (34888), झारखंड (95897), कर्नाटक (32644), मध्य प्रदेश (91972), राजस्थान (47666) आणि पश्चिम बंगाल (72220) यांची नावे प्रमुख आहेत.