अजित पवार भाजपाच्या वाटेवर ? BJP च्या ‘कोअर’ कमिटीच्या बैठकीत ‘सामील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उद्या दुध का दुध अन् पाणी का पाणी होईल असं सांगत आहेत तर दुसरीकडे भाजपाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर म्हणजेच वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे सामील झाल्याचे वृत्त आहे. अजित पवार भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीस उपस्थित राहिल्याने अजित पवार हे भाजपाच्या वाटेवर आहे काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्याचा वेळ सुप्रीम कोर्टानं दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्या भाजपाच बहुमत सिध्द करून दाखवणार असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं आहे. त्यामुळे भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बहुमताचा आकडा गाठवण्यासाठी रणनीती ठरवण्यात येत आहे. त्याच बैठकीला अजित पवार उपस्थित राहिल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांकडून तसेच खुद्द शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्याकडून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न चालु आहेत.

आज सकाळी अजित पवार हे ट्रायंडट हॉटेलमध्ये गेले होते. तिथं त्यांची कोणासोबत भेट झाली हे अद्याप समजु शकले नाही मात्र तेथेच ते शरद पवारांना भेटले अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

Visit : Policenama.com