सत्ताबदलाचा ‘फटका’ महामंडळांना बसणार ! भाजपच्या अध्यक्षांची पदे जाणार

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ताबदलानंतर महापालिकांमध्ये बदल झाले आहेत. त्याचप्रमाणे सत्ताबदलाचा परिणाम महामंडळांमध्ये देखील होणार आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला दोन राज्यमंत्री दर्जाची पदे आणि एक महामंडळ अध्यक्षपद मिळाले. मात्र, आता राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने ही पदे जाणार आहेत. पिंपरी चिंचवड शहराला प्राधिकरण, लोकलेखा समिती आणि आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले होते.

2014 मध्ये भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर प्राधिकरणाच्या अध्यक्षपद सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सचिन पटवर्धन आणि आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद अमित गोरखे यांना मिळाले होते. आता राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने त्यांना पदे सोडावी लागणार आहेत. भाजपची ताकद वाढवण्यासाठी शहरातील स्थानीक कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे दिली होती. सचिन पटवर्धन यांना सगळ्यात आधी राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले राज्य लोकलेखा समितीचे अध्यपद दिले.

भाजपने सर्व गटांना निष्ठावंतांना एकत्र ठेवण्यासाठी महत्वाची महामंडळे दिला. मुंडे गटाचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या सदाशिव खाडे यांना भाजपने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. राज्यात आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी या पदांवर लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली नव्हती. परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी या पदांवर लोकप्रतिनिधींची नियुक्ती करत भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला.

राज्यात सर्वात मोठे बजेट असलेले व राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद पिंपरी चिंचवड शहराला दिले. पिंपरी चिंचवडमधील भाजपचे कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे अमित गोरखे यांना देण्यात आले. महामंडळाव्यतिरीक्त भाजपची महापालिकेतही सत्ता असल्याने भाजपला शहरात आपली ताकद वाढवण्यास मदत झाली.

मात्र, राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर राज्यातील भाजपची सत्ता गेली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. राज्यातील सत्ता गेल्याने पिंपरी चिंचवड शहराला मिळालेल्या तिन्ही मंडळावरील अध्यक्षांना आपले पद सोडावे लागणार हे जवळपास स्पष्ट झाले.

Visit : Policenama.com