महासंचालक पडसलगीकर यांना मिळू शकते आणखी मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ३१ ऑगस्ट रोजी महासंचालक पदावरून निवृत्त होणारे राज्याचे पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांना राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ ३० नोव्हेंबर रोजी संपत असून राज्य सरकार पडसलगीकर यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता असून तसा विचार राज्य सरकार करत आहे. दिवाळीनंतर याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार असल्याचे समजते.

राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रमुख अजित डोवाल हे मागील महिन्यात महासंचालक पडसलगीकर यांच्या भेटीला आले होते. पडसलगीकर यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती महासंचालकपदी केली जाणार आहे. पण आयुक्त म्हणून त्यांना अत्यंत अल्पकाळ मिळणार असल्याने राज्य सरकारचा त्यांना एवढ्यात बदलण्याचा विचार नसल्याने पडसलगीकर यांना मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. आयुक्त म्हणून जयस्वाल यांच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समाधानकारक आहेत. पडसलगीकर यांना आणखी मुदतवाढ मिळणार असल्याने मुंबईच्या आयुक्तपदावर येण्यास उत्सुक असलेल्या डॉ. परमवीर सिंह यांची संधी हूकणार आहे.

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना राज्य सरकार आपल्या विश्वासातील कुठल्याही बड्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्याची शक्यता नाही. पडसलगीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जातात.