राज्यात Lockdown अटळ; किमान 15 दिवसांच्या कडक निर्बंधाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रासाठी कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक भयंकर ठरली आहे. कारण दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्था तोकडी पडत असून रुग्णालयांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन अशा गोष्टींची कमतरता भासू लागल्याचे पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर यासंदर्भात थेट संकेत दिले आहेत.

कोरोना साथीची साखळी तोडायची असेल तर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत मांडले. तसेच राज्यातील जनतेचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहकार्य करा. राजकारण करु नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. तर विरोधी पक्षाने आगोदर मदत जाहीर करा, मगच लॉकडाऊन करा, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या बैठकीत कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नसून किमान 15 दिवसांसाठी राज्यात सरसकट लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना साथीचा आढवा घेतला. कुंटे यांनी आकडेवारीसह परिस्थितीचे गांभीर्य यावेळी सांगितले. या बेठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार, राजेश टोपे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, वैद्यकीय संचालक तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

एक रुग्ण 25 जणांना बाधित करतो – मुख्यमंत्री

कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. संसर्ग झालेला एक रुग्ण 25 जणांना बाधित करतो. त्यामुळे ही साखळी तोडणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात तरुण, लहान मुले बाधित होत आहेत.त्यामुळे एकमुखाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यामध्ये राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

15 एप्रिलनंतर परिस्थिती गंभीर होईल

राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे. नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बैठकीत दिला. सर्वांसमोर त्यांनी कोरोना संबंधित सादरीकरण केले.

कोण काय म्हणाले

उपमुख्यमंत्री अजित पवार – वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे. पुण्यात रुग्णांचा आकडा लाखाच्या पार गेला आहे. त्यावर गंभीर उपाय शोधताना लॉकडाऊन सरसकट करावा लागले.

अशोक चव्हाण- कोरोना निर्बंध लावताना समतोल असावा. गरजू घटकांचाही विचार व्हावा. कर्जफेडीसाठी गतवर्षी प्रमाणे पुन्हा मॉरेटोरियम योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करावी. कठोर लॉकडाऊन लागू होणार असेल तर, बाहेरगावी असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी म्हणून काही कालावधी देण्यात यावा.

विजय वडेट्टीवार – किमान तीन आठवड्यांचा लॉकडाऊन केला जावा. तरच ही साखळी तुटण्यास मदत होईल

देवेंद्र फडणवीस – सरकारने लॉकडाऊन करण्यापूर्वी मदत जाहीर करावी. मगच लॉकडाऊन जाहीर करावा. कोणत्याही स्तरातील जनतेला त्याचा फटका बसता कामा नये. लोक लॉकडाऊनच्या विरोधात आहेत, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आम्ही राजकारण बंद करतो, मात्र तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांना समज द्या. आम्ही देखील सहकार्य करु, पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या. मंदिरावर अवलंबून असलेले, केशकर्तनालय यांच्या मदतीचा विचार करावा. पूर्ण मदत नको, पण लोक जगले पाहिजेत याचा विचार व्हावा.तसेच कोरोना रिपोर्ट तातडीने मिळाले तर प्रसार कमी होईल. राज्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा असून राज्याने यामध्ये हस्तक्षेप करुन परराज्यात, परदेशात जाणारे रेमडेसिव्हिर रोखले पाहिजेत, असेही फडणवीस म्हणाले.