home page top 1

कांचन कुल यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची १० किंवा ११ एप्रिलला बारामतीत सभा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राज्यात भाजपकडून निवडणुकीच्या कालावधीत जास्तीत जास्त सभा घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ सभा होणार असून बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मोदींची १० किंवा ११ एप्रिल रोजी बारामतीत सभा होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सभांच्या तारखा अद्याप निश्‍चित झालेल्या नाहीत. मात्र, मोदींनी बारामतीमध्ये सभा घेण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय एक-दोन दिवसात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बारामती लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्‍ला आहे. तेथुन यापुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नेतृत्व करीत होते तर आता खा. सुप्रिया सुळे या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. सुमारे दोन महिन्यांपुर्वी पुण्यातील गणेश कला क्रिडा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावेळच्या निवडणुकीत बारामती देखील जिंकू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हपासुनच भाजपकडून बारामती लोकसभा मतदार संघात मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. बारामतीमधुन रासपचे महादेव जानकर हे त्यांच्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना कमळाच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह भाजपने धरला होता. त्यांना ते मान्य नसल्याने भाजपने पुणे जिल्हयातील दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहिर केली. उमेदवारी जाहिर झाल्यापासुनच कांचन कुल या मतदार संघ पिंजून काढत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यातच बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याची चर्चा सुरू असल्याने केवळ भाजपच नव्हे तर शिवसेना आणि इतर मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह व्दिगुणीत झाला आहे. मोदींची सभा बारामतीत कधी होणार हे आगामी दोन दिवसांमध्ये निश्‍चित होणार असले तरी युतीचे कार्यकर्ते आतापासुनच कामाला लागले आहेत.

बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला, भोर, दौंड आणि पुरंदर येथुन गेल्या लोकसभा निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे यांना कमी मतदान झाले होते. त्यामुळे भाजपने तेथे अधिक जोर लावला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणाहून राष्ट्रवादीला कमी मतदान झाले आहे. त्या ठिकाणची यादी काढून संबंधित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहरातील कात्रज आणि सिंहगड रोडचा परिसर बारामती लोकसभा मतदार संघात येतो. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत शहरालगतच्या भागातुन राष्ट्रवादीला अधिक मतदान झाले नव्हते. त्यामुळे भाजपने यंदा शहरालगतच्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

Loading...
You might also like