‘पराभव झाला तर देश सोडावा लागेल’ : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आता मतदारांना भावनिक साद घालत आहेत. जो बायडेन यांच्याविरोधात निवडणूक हरलो, तर मला अमेरिका सोडावी लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते जॉर्जिया माकॉन येथील प्रचारसभेत बोलत होते.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. येत्या 3 नोव्हेंबरला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

येथील प्रचारसभेत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. राष्ट्राध्यक्षीय राजकारणाच्या इतिहासात मी एका वाईट उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे, असे ट्रम्प म्हणाले. अशा उमेदवाराविरोधात निवडणूक लढवताना तुमच्यावर दबाव येतो असे ट्रम्प यांनी सांगितले. तुम्ही कल्पना केलीय का. या निवडणुकीत माझा पराभव झाला तर राजकारणाच्या इतिहासात एका वाईट उमेदवाराकडून माझा पराभव झाला असेच मी आयुष्यभर म्हणत रहीन. मला अजिबात चांगले वाटणार नाही. मला कदाचित देश सोडावा लागेल असे ट्रम्प म्हणाले.