मायावती पंतप्रधानपदाच्या ‘लायक’ नाहीत : अरुण जेटली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा फक्त बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वच विरोधी पक्षांचे नेते तुटून पडले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता मायावती यांनी पंतप्रधानांवर काल टीका केली. या टीकेला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मायावतींच्या वक्तव्यांवरून त्या पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत हेच स्पष्ट होतं असं जेटलींनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधानांनी त्या प्रकरणावरून त्यांच्यावर टीका केल्याने त्या भडकल्या.

काय म्हटल्या होत्या मायावती – भाजपामध्ये खासकरून विवाहीत महिला त्यांचे पती मोदींकडे गेल्यावर हा विचार करून घाबरतात की, कदाचित मोदी आपल्या पत्नीप्रमाणेच आम्हालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना, अशी जळजळीत टीका मायावती यांनी केली. मोदी हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये देखील मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात शाब्दिक चकमक घडली होती. अमित शहा यांच्या रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाधवपूर येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. या लोकसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जींना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले आहे.