काँग्रेस-भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू : मायावती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यास देशातल्या प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देऊ, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं होते. त्यावर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला आहे. मायावती यांनी राहुल गांधींना काँग्रेसच्या जुन्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.

काँग्रेसचा ‘गरीबी हटाओ’ हा बहुचर्चित नारा होता. तर सध्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारने परदेशातून काळा पैसा आणण्याचा आणि देशातल्या प्रत्येकाच्या खात्यात १५-२० लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. या दोन्ही पक्षांचे आश्वासनं फेल ठरले आहेत, असं मायावती यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे यापूर्वीचे सरकार आणि विशेषतः इंदिरा गांधींचं सरकार, ज्या सरकारमध्ये ‘गरीबी हटाओ’चा नारा देण्यात आला होता, त्याचं काय झालं ?, असा सवाल त्यांनी राहुल गांधींना केला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवलेल्या नाहीत. त्यांच्या घोषणा या हवेतच विरल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.