महापौर किशोरी पेडणेकर यांचे कॉर्पोरेट ऑफिस SRA फ्लॅटमध्ये ?, आता शिवसेनेची वाढणार डोकेदुखी ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर भाजपने आता शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अनाधिकृत बांधकामे उघड करण्याचे काम सुरु केलंय. मुंबईतील वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीतील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. त्यामुळे आता शिवसेना पक्षाची डोकेदुखी वाढणार असल्याचे समजत आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एसआरएमधील फ्लॅट त्यांच्या कॉर्पोरेट कंपनीच्या नावाखाली घेतला आहे. किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडे दिलेल्या कागदपत्रात त्यांचा पत्ता आणि कॉर्पोरेट कंपनीचा पत्ताही एसआरएमधील इमारती इथला आहे. याबाबत माझ्याकडे सगळी कागदपत्रे आहेत, त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी, असे मागणी करून आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय.

याअगोदर किरीट सोमय्या यांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या मुंबईमधील अनाधिकृत कार्यालयाला भेट दिलीय. म्हाडाची जागा अनिल परब यांनी बळकावून तिथे कार्यालय उभे केलंय. म्हाडाने याबाबत अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. एक 1 वर्षापूर्वी नोटीस देऊन देखील या कार्यालयावर कारवाई केलेली नाही, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता भाजपकडून आक्रमकपणे शिवसेना नेत्यांचे अनाधिकृत बांधकामांची पोलखोल करण्याची मालिका उघडली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरुय. मात्र, या प्रकारावरुन शिवसेनेची मात्र कोंडी होत आहे, असे दिसून येतंय.

शिवसेना कंगना राणावत प्रकरणावरुन बॅकफूटवर
मुंबईतील दादर, परळमधील शिवसैनिकांच्या मनात सध्या हीच भावना आहे की पत्रकार अर्णब गोस्वामीनी बाळासाहेबांच्या काळात ही अशी आगपाखड केली असती तर काय झालं असतं? खळ्ळखट्याकचे दिवस गेले! रणकंदन ही शिवसेनेची रणनीती होती. ती आज नाही. कंगना रणावतबद्दल शिवसेनेने जी रणनीती आखली होती, ती आता फेल गेली आहे. ’मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला हात लावून दाखवा’, अशी धमकी कंगना रणावतने दिली होती. आणि त्यानुसार कंगना मुंबईत आली देखील.

कंगना मुंबईत उतरण्याच्या काही मिनिटे अगोदर तिच्या कार्यालयाचे अवैध बांधकाम पाडून तिच्या येण्यावरील मीडियाचा फोकस शिवसेनेने हटवला. पण, बुलडोझर चालविल्याच्या घटनेने कंगनाला विनाकारण सहानुभूतीही मिळालीय. कंगनाचं थोबाड फोडू म्हणणारे तिला धक्का देखील लावू शकले नाहीत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील त्यानंतर मौन साधले. खासदार संजय राऊत यांनाही ’कंगनाचा विषय आता संपला’ असे जाहीर करावं लागलंय. म्हणून कंगना प्रकरणात शिवसेना आता बॅकफूटवर गेलीय.

कंगना ठोकणार दोन कोटींचा दावा, कार्यालयाचं झालंय नुकसान
अभिनेत्री कंगना रणावतने मुंबई महापालिकेने ऑफिस तोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही या वादात ओढलंय. तसेच आता महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात आहे, असे कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज आहे.ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते,असे कंगनाच्या वकिलांनी सांगितले. महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलीय. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटी इतकी आहे. तसेच कंगनाने उच्च न्यायालयामध्ये बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अ‍ॅफिडेव्हीट दिलंय. बीएमसी अधिकार्‍यांच्याविरोधात कारवाई करणार आहे, असे कंगनाचे म्हणणे आहे.