कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक विधानसभेच्या रिंगणात, भाजपची पहिली यादी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे. भाजपने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे पुण्यातून एकही जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आलेली नाही. सर्वच्या सर्व जागा भाजपाने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गिरीश बापट यांनी निर्विवाद वर्चस्व केलेला कसबा मतदारसंघ बापट हे दिल्लीला लोकसभेवर निवडून गेल्यावर खाली झाला होता. अशावेळेस भाजपने कसब्यातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी घोषित केली आहे.

पुण्यातून पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक, हडपसर मतदार संघातून योगेश टिळेकर, भोसरीमधून महेश लांडगे तर शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट देण्यात आले आहे.

पुण्यातून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना उमेदवारी नाकारून त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे या दिग्गज नेत्यांची नावे दिली गेलेली नाहीत.

Visit : policenama.com