मुंबईच्या महापौर बनल्या ‘करोना योद्धा’,रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा फैलाव सर्वाधिक झाला असून मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेसह राज्य सरकार कोरोनाविरोधात युद्ध पातळीवर काम करत आहे. असे असताना खुद्द मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘कोरोना योद्धा’ बनल्या आहेत. याआधी आरोग्य सेवा बजावलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या नायर रुग्णालयात आपला जुना नर्सचा युनिफॉर्म पुन्हा परिधान करून त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून विद्यार्थिनींचे मनोधैर्य वाढवले. शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले की, त्या रात्री उशीरापर्यंत काम करणार आहेत.


शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून म्हटले की, या आमच्या मुंबईतील आदरणीय महापौर किशोरी पेडणेकर आहेत. त्या सकाळी आठ ते रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात आणि आता महानगराच्या सेवेसाठी परिचारिकेचा गणवेशही परिधान करून काम करत आहेत. त्या नायर रुग्णालयात काम करत आहेत.

त्यांनी सांगितले की, जी लोकं त्यांच्याविषयी अपमानास्पद ट्विट करीत आहे त्यांनी धडा घ्यावा. स्वत: पासून आधी काम करा. महापौरांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईसाठी काहीही, आम्ही घरात बसून काम करु शकत नाही. आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुम्ही घरी रहा, काळजी घ्या…. मी नायर हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांगत त्यांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.