महापौर हल्ल्याचा ‘क्राईम’ ब्राँचकडे तपास : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी नागपूर पोलीस दलातील क्राईम ब्राँचकडे सोपविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत केली.

महापौर संदीप जोशी यांच्या गाडीवर काल मध्यरात्री बारा वाजता मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. याबाबत सभागृहात निवेदन करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ही दुर्दैवी घटना आहे. आपल्याला याची माहिती मिळताच मी नागपूर पोलीस आयुक्तांना बोलावून घेऊन माहिती घेतली. या हल्ल्याची चौकशी क्राईम ब्राँचकडे सोपविण्यात आली आहे. गुंडगिरी करणाऱ्यांची मुलाहिजा बाळगणार नाही. महापौरांनाही भेटायला बोलावले आहे. त्यांची भेट घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

ठाकरे यांच्या निवेदनानंतर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, यापूर्वीही नागपूरात अनेक गंभीर गुन्हे घडले होते. पण मुख्यमंत्र्यांनी तेव्हा दखल घेतली नव्हती. पण, आता ठाकरे यांनी स्वत: सभागृहाला निवेदन करुन चांगला पायंडा पाडला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/