Pune News : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील ‘त्या’ हरणांच्या मृत्यूची चौकशी करा; महापौरांनी दिले आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 हरणांचा मृत्यू झाला असून याची चौकशी तत्काळ करावी, असा आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला दिलेत.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होती. मनसेकडून हरणांची प्रतिकात्मक स्वरूपात तिरडी सभागृहामध्ये आणली. तसेच राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील ‘प्राणी वाचवा’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. या घटनेला 10 दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतरही त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या नाहीत. त्याचबरोबर शहरातील अनेक उद्यानांची दुरावस्था झालीय, याकडे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी लक्ष वेधले.

या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही सहभाग घेतला. महापालिका प्रशासनाने यावर खुलासा करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केलीय. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये प्राण्यांच्या सुरक्षेच्यादृृष्टीने तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. त्याचबरोबर ही घटना कशामुळे घडली, याला कोण जबाबदार आहेत?, याची चौकशी महापालिका प्रशासनाने करावी.”