Video : शीतल आमटेंच्या वृत्तानं अस्वस्थ झाली अभिनेत्री मयुरी देशमुख ! म्हणाली- ‘मी तर रोज रडते, परंतु…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शीतल आमटे (Sheetal Amte) यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली होती. सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. कौटुंबिक वादामुळं त्या तणावात होत्या. बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) चा पती आशुतोष भाकरे (Aashutosh Bhakre) यांनीही तणावात जाऊन आत्महत्येचं पाऊल टाकलं. डिप्रेशनकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु आज ही खूप गंभीर समस्या बनली आहे. मयुरी देशमुख हिनं आता एक व्हिडीओ शेअर करत यावर भाष्य केलं आहे.

मयुरीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, शीतल आमटे यांची बातमी ऐकून फार अस्वस्थ झाले. काही दिवसांपूर्वीच माझी आणि शीतल ताईंची फेसबुकवरून ओळख झाली होती. आधी आमची ओळख नसतानाही ती माझ्या पाठीशी उभी राहिली. काही दिवसांपूर्वीच मी आशुतोषला शीतल ताईंचा व्हिडीओ दाखवला होता. आम्हाला तिचं खूप कौतुक वाटलं होतं.

पुढं मयुरी म्हणते, आपल्या समाजात तणावाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. जर तुम्हाला अशी काही समस्या जाणवली तर तुम्ही जवळच्या व्यक्तींसोबत संवाद साधा. मी तर रोज रडते. परंतु मी माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत संवाद साधत असते. आपण दुखी आहोत हे आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगण्यात कमीपणा वाटू देऊ नका. या भावना व्यक्त करण्याचं धाडस तुमच्यात असेल तर तुम्ही स्ट्राँग आहात.

मयुरी म्हणाली की, मुलांनी रडायचं नाही, सगळी संकटं एकट्यानं पेलायची, समाजातील मोठ्या व्यक्तींवरही भार आपण टाकतो. परंतु हे बदललं पाहिजे. अशी बुरसटलेली व्याख्या आपल्यासाठीच घातक आहे.

मयुरी असंही म्हणाली, आशुतोष गेल्यांतर मला अनेक लोकांचे सोशल मीडियावरून मेसेज आले. त्यातल्या 99 टक्के लोकांना मी ओळखतही नव्हते. परंतु त्याच्या मेसेजमुळं मला धीर मिळाला. त्यांच्याकडून मिळालेल्या ऊर्जेमुळं मला पुन्हा काम करण्याचं बळ मिळालं.

You might also like