Pimpri News : परदेशी, शिंदे टोळीवर ‘मोक्का’ !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सुरज परदेशी आणि संदीप शिंदे यांच्या दोन्ही टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. सुरज परदेशी आणि संदीप शिंदे हे दोघे टोळी करून संघटितरित्या दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार आहेत. या दोन्ही टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बुधवारी (दि. ३१) दिले आहेत.

सुरज परदेशी याच्या टोळीवर पिंपरी, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत. घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणे, घरफोडी, दुखापत, खंडणी, बेकायदेशीर जमाव जमवून गंभीर दुखापत, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, असे गुन्हे परदेशी टोळीवर दाखल आहेत. चाकण परिसरात दहशत माजवणारा टोळी प्रमुख संदीप अरुण शिंदे (वय ४२, रा. चाकण), ओंकार मनोज बिसणारे (वय २०, रा. चाकण), निखिल उर्फ दाद्या रतन कांबळे (वय २०, रा. चाकण), नामदेव प्रकाश नाईक (वय २०, रा. चाकण), हर्षद संदीप शिंदे (वय २२, रा. चाकण) आणि सहा विधीसंघर्षग्रस्त मुलांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर संदीप शिंदे याच्या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी-मारामारी, दरोड्याची तयारी, वाहनांची जाळपोळ, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे २० गंभीर गुन्हे चाकण आणि भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या टोळीची दहशत चाकण परिसरात वाढत असल्याने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

यंदा तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ११ टोळ्यांमधील ७५ सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. वाकड परिसरात दहशत माजवणारा टोळी प्रमुख सुरज दयाराम परदेशी (वय २७, रा. काळेवाडी), राजू रामकिशन ठाकूर (वय २५, रा. थेरगाव), रसल रामप्रवेश गौंड (वय १८, रा. काळेवाडी), शंकर दयाराम परदेशी (वय २६, रा. काळेवाडी), राम अनिल आवळे (वय २६, रा. काळेवाडी), नितीन भोसले (रा. काळेवाडी) या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.