महिला आयपीएसवर हल्ला करणाऱ्या माजी उपमहापौर शमा मुल्लासह ४० जणांवर मोक्का

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर येथील यादवनगरमध्ये माजी उपमहापौरांच्या पतीच्या घरावर छापा घातल्यानंतर पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मटका बुकी सलीम मुल्लाच्या चार साथीदारांना कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर माजी उपमहापौर शमा मुल्ला, पती सलीम मुल्ला यांच्यासह ४० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

माजी महापौर शमा मुल्ला हिचा पती सलीम मुल्ला याची येथील काळ्या धंद्यांवर प्रचंड दहशत आहे. यादवनगर, उत्तमनगर, पांजरपोळ, उद्यमनगरसह टेंबलाईवाडी, विक्रमनगर येथे त्याचा मटका सुरु आहे. सोमवारी रात्री निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी उघडलेल्या माहिमेत प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी सलीम मुल्ला याच्या संपर्क कार्यालयावर छापा घातला. त्याच्या घरातून मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. मात्र ऐश्वर्या शर्मा यांनी छापा टाकताच मुल्ला आणि परिसरातील महिला व युवकांनी धाड टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. ऐश्वर्या शर्मा यांच्यासह इतरांना जोरदार मारहाण करण्यात आली. महिला अधिकाऱ्याला मारहाण करत असल्याचे पाहून एक कर्मचारी पुढे आला. तेव्हा त्याला जबर मारहाण करत वर्दी फाटेपर्यंत मारहाण केली. त्यानंतर त्यांचीच सर्विस रिव्हॉल्वर घेऊन ते ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिसांवर रोखले. त्यानंतर त्यांचे सर्विस रिव्हॉल्वर घेऊन ते पसार झाले होते.

त्यानतंर सलीम मुल्ला साथीदारांसह पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सलीम मुल्लाच्या ४ साथीदारांना पोलिसांनी आज अटक केली. यापुर्वी पोलिसांनी २१ जणांना अटक केली होती. आता त्याची संख्या २५ झाली आहे. त्यात निलेश दिलीप काळे, राजू येशील, सुंदर रावसाहेब दाभाडे व जावेद मुल्ला यांचा समावेश आहे. चौघांना लक्षतीर्थ वसाहतीजवळ त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले.