रवी पुजारीच्या हस्तकाविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांनी आज कुख्यात गुन्हेगार रवी पुजारीच्या हस्तकाविरोधात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिकाला दूरध्वनीवरून धमकावून दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सदर बांधकाम व्यावसायिकाची माहिती पुजारीला देणाऱ्या विल्यम अल्बर्ट रॉड्रिक्‍स (21) याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2018 पासून पुजारी या बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावत असे. यानंतर त्याने मात्र खंडणीसाठी नकार दिला. यानंतर पुजारी फारच संतापला आणि त्याने त्याचा भाऊ व वहिनीलाही धमकावण्यास सुरुवात केली. इतकेच काय तर बांधकाम व्यावसायिकाचा परदेशात शिकणाऱ्या पुतण्यालाही त्याने सोडले नाही. पुतण्या भारतात आल्यानंतर त्याला देखील धमकावण्यात आले. या प्रकरणामुळे गोरेगाव परिसरात राहणारी व्यक्तीच या बांधकाम व्यावसायिकाबाबतची माहिती पुजारी टोळीपर्यंत पोहोचवत असल्याचा पोलिसांचा अंदाज होता.

पोलिसांनी याबाबत तपास करण्यास सुरुवात केली. या तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, ओशिवरा बस डेपोसमोर राहणारा विल्यम ही माहिती पुजारी टोळीचा मुंबईतील प्रमुख आकाश शेट्टीपर्यंत पुरवत आहे. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी रॉड्रिक्‍सला अटक केली. त्याच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार करण्याचीही प्रक्रिया सुरू होती. खंडणी मागितल्याप्रकरणी पुजारी व शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शेट्टीलाही अटक करण्यात आली होती. खंडणी विरोधी पथकाने आकाश शेट्टीला यापूर्वी अटक केली असून आता विल्यमला देखील बेड्या ठोकल्या आहेत.