2.5 लाख रूपये घेवून अंमली पदार्थ तस्करास सोडून देणार्‍या 5 पोलिसांना अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अंमली पदार्थांची तस्कारी करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करुन त्यावर कारवाईचा बडगा न उगारता, वरिष्ठांना त्याची माहिती न देता नंदनवन ठाण्यातील 5 पोलिसांनी आर्थिक लाभाच्या लोभापायी ही माहिती कोणालाही कळू दिली नाही. मात्र जेव्हा प्रकरण उघडे पडले तेव्हा या पाच पोलिसांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता या पाचही पोलिसांना अटक करण्यात आली आहे. हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे अशी या अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

हे प्रकरण 14 ऑक्टोबरचे आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नंदनवन पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कार्यरत उपरोक्त पोलीस कर्मचारी गस्तीवर होते, यावेळी संशयित जमाल नामक अंमली पदार्थांचा तस्कर दुचाकीवरुन जाताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन जेव्हा झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडून एमडी पावडरचे दोन मोठे पुडे मिळाले. यावेळी तपास सुरु असतानाच जमाल हा तस्कर पोलिसांच्या हाताला झटका देऊन तेथून पसार झाला. त्याच्या मागे पोलीस पथक रमणा मारोती चौकात पोहचले. तेथे एका टपरीवर चहा पीत असताना त्यांच्याजवळ जावेद नामक आरोपी आला आणि म्हणाला की साहेब, जमालचा पाठलाग करु नका, चहापाणी घ्या असे म्हणत शंभर, पाचशेच्या नोटांचा बंडल पोलिसांच्या हातावर ठेवले. यानंतर या प्रकरणी 5 ही पोलिसांनी मौन बाळगले.

एका निनावी व्यक्तीेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना संपर्क साधत ही माहिती दिली. त्यानंतर एसीपी विजय धोपावकर 19 ऑक्टोबरला नंदनवन ठाण्यात पोहचले आणि त्यांनी ठाणेदार विनायक चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी त्या रुममधील हवालदार सचिन एम्प्रेडीवार यांचे कपाट तपासल्यानंतर त्यात एमडी पावडरचे दोन पाकीट आणि नोटांचे घबाड आढळले. एसीपी धोपावकर यांनी तेथून 23.50 ग्रॅम तसेच 10.50 ग्रॅम एमडी आणि 2 लाख 40 हजाराची रक्कम जप्त केली.

हवालदार सचिन आणि त्यांच्या साथीदारांनी या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये केली नव्हती. ठाणेदाराला याची माहिती नव्हती. त्यानंतर हा गुन्हा पोलिसांनी पैशांसाठी केल्याचा निष्कर्ष निघाल्यावर संबंधित चौकशी अहवाल पोलीस आयुक्तांकडे रविवारी सायंकाळी पाठवला. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपरोक्त पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या 5 पोलिसांना अटक करण्यात आली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com