महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण विभागीय आयुक्तपदी मेधा गाडगीळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण विभागीय आयुक्तपदी माजी सनदी अधिकारी श्रीमती मेधा गाडगीळ यांची नियुक्ती आज राज्यपालांकडून करण्यात आली. भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) माजी अधिकारी असणाऱ्या श्रीमती मेधा गाडगीळ सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव पदावरून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत.

दरम्यान आज झालेल्या कार्यक्रमात राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी श्रीमती गाडगीळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याप्रसंगी राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान, कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा, सहसचिव माधव गोडबोले आदी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या प्रशासनातील सनदी अधिकारी म्हणून काम केलेल्या मेधा गाडगीळ यांनी आपल्या कारकिर्दीत विविध मंत्रालयामध्ह्ये चमकदार कामगिरी केली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळात त्यांची बदली झाली होती त्यानंतर आठवडाभरातच पुन्हा बदली करण्यात येऊन त्यांना मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रशासकीय सुधारणा आणि रचना कार्य या विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर काही काळातच याच पदावर असताना त्या निवृत्तझाल्या होत्या. याआधी त्या मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर होत्या. त्यावेळी त्यांनी या विभागाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी चांगले प्रयत्न केले होते.

अशी होते नियुक्ती :

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ नुसार राज्यपाल, तीन व्यक्तींनी मिळून बनलेल्या समितीच्या शिफारशीनुसार मुख्य आयुक्तांची आणि आयुक्तांची नियुक्ती करतात. यात मुख्यमंत्री (जे या समितीचे अध्यक्ष असतील) विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित करावयाचे एक कॅबीनेट मंत्री यांचा समावेश असतो. या तिघांनी मिळून शिफारस केल्यानंतर राज्यपाल नियुक्ती करतात.