मराठा आरक्षणाविना राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरू झाली आहे. मात्र ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

मेडिकल (एमबीबीएस) आणि दंतवैद्यकीय (बीडीएस) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रक्रियेत राज्याची सर्वसाधारण पहिली गुणवत्ता यादी 13 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. तर मेडिकल प्रवेशाची सेंट्रलाइज ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी ही 6 नोव्हेंबरला सुरू होऊन 12 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी 13 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे . यामुळं कोणत्या प्रक्रियेला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला असून विद्यार्थी संभ्रमात आहेत.

प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये राखीव असलेल्या 15 टक्के जागांवरील प्रवेश ऑल इंडिया कोट्यातून करण्यात येतात.या कोट्याची प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश घ्यायचा की राज्याच्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेणं अवघड झालं आहे. राज्याने गुणवत्ता यादी ऑल इंडिया कोट्याची पहिली फेरी होण्यापूर्वी जाहीर करावी, अशी मागणी मेडिकल विद्यार्थ्यांनी केली आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी – 12 नोव्हेंबर, सायं. 5 वाजेपर्यंत
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे – 6 ते 13 नोव्हेंबर
पहिली गुणवत्ता यादी – 13 नोव्हेंबर, सकाळी 8
पहिली प्रवेश यादी – 15 नोव्हेंबर, सायंकाळी 5
पहिल्या यादीनुसार प्रवेश घेणे – 20 नोव्हेंबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत