पुण्यात लवकरच सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय, अशी असेल रचना, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना ( Corona) काळात पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था नीट नसल्याने संकटांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासह महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी म्हणून नवीन आरोग्य महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयाचे वर्ग यावर्षी मंगळवार पेठेतील सणस शाळेत भरणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरू होणार असून, यामध्ये पहिल्या वर्षी १०० मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी महापालिकेचे दळवी आणि फुरसुंगीतील रुग्णालय देण्यात आले आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था औंधमधील ( Aundh) महापालिकेच्या इमारतीत करण्यात आली आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सणस शाळेत सुसज्ज वर्ग खोल्यांसह त्या ठिकाणी तीन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. महाविद्यालयाचे वर्ग भरणाऱ्या इमारतींसह सरावासाठीच्या रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी आरोग्य खात्याचे पथक दोन दिवसांत पुण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. या नवीन महाविद्यालयाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ( Atal Bihari Vajpayee) यांचे नाव देण्यात येणार असून, महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाच्या ( Dr. Naidu Hospital) जागेत हे नवीन महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. यावर्षीपासून पहिल्या बॅचला सुरुवात करण्यात येणार असून, पहिल्या शंभर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची शिफारस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्य सरकारला नुकतीच केली आहे. त्यादृष्टीने पायाभूत कामे हाती घेण्याची तयारी महापौर मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol) यांनी सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच या इमारतीच्या कामालादेखील सुरुवात होणार आहे.

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून पहिल्या वर्षीपासून पुणेकरांना सामावून घेतले जाणार आहे. या काळातही त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी नव्या गावातील म्हणजे फुरसुंगीतील रुग्णालय निश्‍चित करीत असल्याची माहिती पुणे ,महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याविषयी बोलताना या नवीन वैद्यकीय महाविद्यालयामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही पहिल्या वर्षीपासूनच विद्यार्थी आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्‍यक तेवढ्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे.