वैद्यकीय परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत झाला निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यावर नाराजीचा सूर उमटल्याने जुलैमधील परीक्षा स्थगित झाली असून परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस आधी जाहीर केले जाणार आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास आदेश दिले आहेत.

अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचे राज्य सरकारचे धोरण असताना वैद्यकीय परीक्षा रद्द करण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे या परीक्षा होणार आहेत. यासाठी परीक्षेबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपलांची भेट घेऊन परीक्षेचा आराखडा तयार केला होता. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 16 ते 22 जुलै 2020 अशी सलग परीक्षा घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. तसेच त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचा 5 लाखाचा विमा काढण्यासाठीही सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यावरून विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत फक्त पाच लाख आहे का ? असा संतप्त प्रश्न विचारत विद्यापीठावर टीका झाली होती.
तसेच सलग परीक्षेला विरोध होत होता. या संदर्भात बुधवारी वैद्यकीय शिक्षण अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना आदेश दिले आहेत. यामध्ये परीक्षा सुरु होण्याच्या 45 दिवस आधी विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर करावे. परीक्षेच्या एका पेपरनंतर दरवर्षीप्रमाणे एक दिवसाचे अंतर ठेवावे असे आदेशात नमूद कण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांच्या आदेशामुळे जुलै महिन्यात होणारी वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच भविष्यात कोरोनाची स्थिती पाहून परीक्षेचे नियोजन करावे लगणार आहे. या परीक्षा जिल्ह्यात होणार असल्या तरी देखील विद्यार्थ्यांना 50 किमीपर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी वाहतूकीची सुविधाही उपलब्ध केली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.