रूग्णांशी कसे वागायचे; डॉक्टर घेताहेत धडे

पोलीसनामा ऑनलाइन – रूग्णाचे कुटुंबिय आणि डॉक्टरांमधील संघर्षाच्या बातम्या आपण नेहमीच पाहतो. कधी-कधी तर याच संघर्षातून हाणमारीचे प्रकार घडतात. डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी यांना मारहाण होण्याचेही प्रकार अनेकदा घडत असतात. डॉक्टर आणि रूग्णांचे नातेवाईक यांच्यातील संवादात काही चूक झाल्यास असे प्रसंग उद्भवतात.

नवीन डॉक्टरांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी कसे वागावे हे समजत नाही. अशावेळी चुकीचा शब्द वापरला गेल्यास रुग्णांच्या मनात डॉक्टरांविषयी गैरसमज निर्माण होतात. रुग्णाव उपचार सुरू असताना त्यांचे नातेवाईक चिंतेने हवालदिल झालेले असतात. अशा परिस्थितीत हे गांगरलेले नातेवाईक डॉक्टरांना अनेक प्रश्न विचारतात. यावेळी योग्यरित्या संवाद साधला न गेल्यास अनेक अप्रिय घटना घडतात. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देणे महत्वाचे ठरते. केईएम रुग्णालयात २०१६ साली मेडिकल ह्युमॅनिटिज विभाग सुरू करण्यात आला असून या विभागात रुग्णालयातील नव्या डॉक्टरांना रुग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांशी कसे बोलावे हे शिकवले जाते.

या विभागांतर्गत अंदाजे १० हजारांहून अधिक डॉक्टरांनी हे प्रशिक्षण दिले गेले आहे. डॉक्टरांच्या वागण्याबाबत अनेक तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक करत असतात. सध्या डॉक्टर आणि रुग्णांमधील नाते कमकुवत झाल्यासारखे वाटते. डॉक्टरांवरील विश्वास कमी झाल्याने डॉक्टरांवरील हल्ले वाढत चालले आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी कसं बोलावं यासाठी केईएम रुग्णालयात मेडिकल ह्युमॅनिटिज या विभाग डॉक्टरांना प्रशिक्षण देत आहे. एखादा विद्यार्थी पुढे जाऊन चांगला डॉक्टर होऊ शकतो. परंतु, त्यास रुग्णांशी संवाद साधता आला नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेक नैतिक पैलू आहेत जे डॉक्टरांना त्यांची सेवा देताना उपयोगी पडतात. यासाठी हे प्रशिक्षण डॉक्टरांना देण्यात येते. या माध्यमातून रुग्णालयातील नवीन डॉक्टरांना रुग्णांशी कसे बोलावे, याबाबत माहिती दिली जाते. याशिवाय एमबीबीएस विद्याथ्र्यांच्या बदललेल्या अभ्यासक्रामात पहिल्यांदा रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नातं सुधारण्यास नक्कीच मदत होणार आहे. रुग्णांचा वाढता भार लक्षात घेता डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. शिवाय स्पर्धात्मक युगात अनेक विद्यार्थी स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे वाढता ताण कसा दूर करावा यासाठी नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.