लाचखोरीची हद्दच झाली ! ‘त्या’ अधिकाऱ्याने चक्क मागितला ‘व्हिस्कीचा खंबा’ अन् ‘टुबर्ग बिअर’च्या ३ बाटल्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अहवाल देण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्याने चक्क व्हिस्कीचा खंबा, ३ बिअरच्या बाटल्या लाच म्हणून मागितल्या. बाटल्याही आल्या, पार्टीला रंग चढणार आणि पेग रिचवणार तेवढ्यात अँटी करप्शनचे पथक दाखल झाले आणि रंगाचा बेरंग झाला.

भालचंद्र हरिहर चाकुरकर (वय ४३ वर्षे, पद – वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, निवळी ता.जि. लातुर, वर्ग २) असे पार्टी मागणाऱ्या या वैद्यकिय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला अँटी करप्शनच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

तक्रारदार हा लातूरमधील निवळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी करतो. तर चाकूरकर हे श्रेणी अ वर्ग २ चे वैद्यकिय अधिकारी आहेत. दरम्यान तक्रारदार कर्मचाऱ्याचा सन २०१८-१९ त्या कामातील अहवालात बी प्लस शेरा देण्यात आला होता. परंतु या अहवालाने आपल्या नोकरीवर परिणाम होईल म्हणून ए प्लस शेरा करण्याची विनंती निवळी प्राथमिक केंद्रातील वरिष्ठांना केली. मात्र वैद्यकिय अधिकारी भालचंद्र चाकूरकरने त्याच्याकडे यासाठी चक्क पार्टी मागितली. परंतु तक्रादाराने याची तक्रार २८ मे रोजी अँटी करप्शनकडे केली. त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला.

शुक्रवारी रात्री लातूर औसा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सर्वजण पार्टीसाठी जमले. पार्टी ठरल्याप्रमाणे सुरु झाली. दारूचा एक खंबा, ३ बिअरच्या बाटल्याही आल्या. दारूचा पेग रिचवणार एवढ्यात अँटी करप्शनचे अधिकाऱी दाखल झाले आणि रंग चढत असतानाच पार्टीचा बेरंग झाला.

अँटी करप्शनच्या पथकाने तेथून दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक वर्षा दंडीमे, कुमार दराडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Loading...
You might also like