५ हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकिय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन – ५ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्याला अन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारकाची अतिदुर्गम भत्त्याची रक्कम मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती.

ओंकार चामड्या वळवी (वय ४३, वर्ष धंदा: वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) ग्रामीण रुग्णालय, तोरणमाळ जिल्हा-नंदूरबार) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली आहे.

तक्रारदार हे तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय येथे अधिपरिचारक (brother) म्हणून नोकरीस आहेत. त्यांची नोकरी सध्या अतिदुर्गम भागात आहे. त्यांना दरमहा ८ हजार रुपये अतिदुर्गम भत्ता मिळतो. मागील वर्षाचा एकूण ९६ हजार रुपयांपैकी ६३ हजार रुपये त्यांना मिळणार होते. ते मिळाल्याने वैद्यकिय अधिकारी वळवी यांनी १० टक्के प्रमाणे ६ हजार ३०० रुपयांची बक्षिस म्हणून लाच मागितली. त्यानंतर तडजोडी अंती ते ५ हजार रुपयांवर तयार झाले.

मात्र तक्रादार यांची पैसे देण्य़ाची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. तेव्हा पथकाने पडताळणी करून सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये घेताना नंदूरबार येथील शासकिय रुग्णालयात रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे यांनी केली.