वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थी आंदोलन, सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेने पाठिंबा दिल्याने राज्य सरकारकडून हे आंदोलन मिटवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारकडून याबाबत अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिली. दुसरीकडे मंत्रालयात अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत आचारसंहिता शिथिल करून सरकारला प्रवेशाबाबत निर्णय घेण्याची मुभा मिळावी, अशी विनंती शिष्टमंडळाने निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्याकडे केली.

सरकारला सर्वोतोपरी मदत करु : अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची देखील अजित पवार यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले आम्ही सरकारला याबाबत मदत करत असून लवकरात लवकर कसा तोडगा काढता येईल यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे सांगितले.