डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी ३ महिला डॉक्टरांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन सिनीअर डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. आता अटक केलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. अंकिता खंडेलवाल, असं आहे.

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात डॉ. पायल शिक्षण घेत होत्या. तेव्हा त्यांच्यासह काम करणाऱ्या वरिष्ठ सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. या त्रासाला कंटाळून पायल यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा निषेध म्हणून नायर रुग्णालयाबाहेर आंदोलने करण्यात आली होती. त्यावर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी येथे भेट देऊन आरोपींना लवकर अटक करण्यात येईल असं आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले आहे. पोलीसांनी कारवाई करत डॉ. भक्तीला अटक करण्यात आली. मात्र इतर दोघी फरार होत्या. त्यांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही महिला डॉक्टरांनी कोर्टात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनाचे अर्ज दाखल केले आहेत. आज यावर न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.