मांडकीत ऊसतोडणी मजुरांची ‘आरोग्य’ तपासणी

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – मांडकी (ता.पुरंदर) येथे नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत येणाऱ्या मांडकी उपकेंद्रामार्फत व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट मुंबई तसेच जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठाण यांचा संयुक्त प्रकल्प डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड प्रोजेक्ट (आशा) यांच्या सहकार्याने ऊसतोडणी मजुरांसाठी शनिवारी (दि.११) आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास ६० मजुरांचे व त्यांच्या मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.

नियमित ऊसतोडणी, उघड्यावर राहणे, स्वच्छ पाणी, योग्य भोवताल यांच्या कमतरतेने ऊसतोडणी मजुरांना आरोग्याचे वेगवेगळे त्रास होत असतात. परंतु कामाचा तगादा, गावापासून लांब असल्यामुळे तसेच औषधांचा खर्च टाळण्यासाठी मजूर दवाखान्यात जात नाही. यामधून आजार जास्त बळावला जातो. या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये जवळपास ६० मजुरांचे व त्यांच्या मुलांचे आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार करण्यात आले. त्याच बरोबर ५ गरोदर मातांना माता बालक संरक्षक कार्ड देखील देण्यात आले.

नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी घाटगे यांनी सर्व मजुरांची तपासणी केली. बेबी तांबे, पोपट गोडसे, संगीता भोसले, अनिता साळुंखे, सीमा जगताप, भामाबाई जाधव यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. तर आशा प्रकल्पाचे रुपाली भोसले, राहुल शिंदे, विवेक बरकडे, मोनाली सरक, विनया जाधव यांनी या आयोजनामध्ये सहकार्य केले.

नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी घाटगे यांनी सांगितले की, ऊसतोड मजुरांची तपासणी केल्यावर महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असणे, गर्भवती महिलांमध्ये रक्ताचच प्रमाण कमी, मजुरांच्या अंगाला खाज सुटणे, शरीरावर जखमा असणे, अंगदुखी इत्यादी आजार जास्त प्रमाणात आहेत. या मजुरांच्या आरोग्यासाठी असे शिबीर गरजेचे आहेत. या मजुरांसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष ओ.पी. डी. साठी आम्ही प्रयत्नशील आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/