विना प्रिस्क्रिप्शन तापाची गोळी दिली तर मेडिकलवाल्यांचे लायसन्स रद्द

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून कल्याण- डोंबिवली शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने काही कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोणत्याही रुग्णाला मेडिकल दुकानात प्रिस्क्रिप्शनशिवाय तापाची एक गोळीसुध्दा देऊ नये, जर दुकानदारांनी हा नियम पाळला नाही, तर थेट औषध दुकानांचा परवाना रद्द करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रेल्वे प्रवाशांची ॲटीजेन चाचणी केली जात आहे. तसेच प्रभागनिहाय आरोग्य सर्व्हेक्षण सुरु केले आहे. तसेच खासगी रुग्णालयात येणा-या तापीच्या रुग्णांची तातडीने कोविड चाचणी करण्याबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत. असे असतानाही बरेच रुग्ण ताप असताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल स्टोअर्समधून औषधे घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा हलगर्जीपणा कोरोनाला निमंत्रण देणारा असल्याने पालिकेने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.