आनंदी, निरोगी जीवनासाठी ‘ध्यान’ करावे ; ‘हे’ होतात फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ध्यान हे साधुसंतांनीच करावे, असा एक समज आहे. मात्र, ध्यान कुणीही, कधीही आणि कोठेही करू शकतो. आपले जीवन आनंदी उत्साही आणि निरोगी ठेवण्याचा ध्यान हा एक सर्वोत्तम उपाय आहे. ध्यान करण्याचे काही नियम, पद्धत आहे, त्यानुसार ध्यान केला पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने ध्यान केल्यास त्याचे चांगले फायदे होतात. ध्यान कसे करावे आणि त्याचे कोणते फायदे होतात, याबाबत आपण जाणून घेवूयात.

ध्यान करण्यासाठी जागा, वेळ, वस्त्र, आसन ठरवून घ्यावे. ध्यानसाधना कोणत्या पद्धतीने करावयाची ते आधी ठरवून घ्यावे. ध्यानसाधनेचा अभ्यास करताना अखंडितपणे साधना करावी. ध्यानासाठी पहाटे ३ ते ३.३० चा मुहूर्त चांगला असतो. सर्वप्रथम ज्या ठिकाणी ध्यान करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या जागेवर आसन टाकून स्वत: शारीरिकरीत्या तयार व्हावे. त्याकरिता मिठाच्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुऊन नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवावेत. ध्यानासाठी अधिक वेळ बसता यावे यासाठी सहा आवर्तने सूर्यनमस्कार, कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम, विलोम, भ्रामरीचा अभ्यास करावा आणि ध्यानासाठी पद्मासन, सिद्धासन किंवा कोणत्याही सुखद आसनात बसावे. ज्यामध्ये पाठीचा कणा सरळ ठेवावा. डोळे शांत मिटलेले आणि दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये असावेत. डोळे बंद केल्यानंतर एकाग्रतेसाठी आनापान सती ध्यानाचा अभ्यास करावा. आनापान सती म्हणजे श्वास घेणे, श्वास सोडणे यावर लक्ष केंद्रित करणे होय. श्वास येत आहे, श्वास जात आहे. याशिवाय दुसरा कुठलाच विचार डोक्यात येता कामा नये. हा अभ्यास दररोज २० मिनिटे सातत्याने तीन महिने केल्याच ध्यानाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकतेवर परिणाम दिसून येतो.

ध्यान केल्याने विविध फायदे होतात. ध्यानामुळे ताणतणाव दूर होतो. मेंदूची कार्यक्षमता वाढते. चिडचिड कमी होते. महिलांमध्ये मासिक पाळीमधील चिडचिड कमी होते. लहान मुलांच्या वागण्या, बोलण्यात, अभ्यासावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. वयोमानानुसार मेंदूची झीज होते. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. अशा वेळी ध्यानाचा अभ्यास केल्यास सकारात्मक बदल दिसून येतो. ज्याप्रमाणे शरीराला टिकवण्यासाठी अन्नाची गरज असते त्याप्रमाणे या शरीरामध्ये आत्मा दीर्घकाळपर्यंत टिकावा यासाठी ध्यान करण्याची गरज असते.

You might also like