बहिणीनं केलं होतं समाजवादी पार्टीच्या माजी मंत्र्यासोबत ‘लव्ह मॅरेज’, भावानं लस्सी पाजून गळा आवळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील मेरठमध्ये एका भावाने आपल्या बहिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या बहिणीने प्रेमविवाह केल्यामुळे नाराज झालेल्या भावाने तिची गळा कापून हत्या केली. मृत तरुणीने समाजवादी पार्टीच्या माजी मंत्र्याबरोबर प्रेमविवाह केला होता. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहील जहां हीचा विवाह सात वर्षांपूर्वी अलिगढमधील खुर्शीद यांच्याबरोबर झाला होता. मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांच्या घटस्फोट झाला. त्यानंतर ती मेरठमध्ये राहायला आली. त्यावेळी सपा नेता आणि माजी मंत्री फारुक हसन याच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. चार महिन्यांपूर्वी दोघांनी कोर्टात लग्न केले. लग्नांनंतर राहिलचे कुटुंबीय तिच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज होते.

लस्सी पाजून केले बेशुद्ध, कापला गळा
घटनेच्या चार दिवस आधी राहिलचा भाऊ तिला आपल्या घरी घेऊन आला होता. बुधवारी रात्री तो लस्सी घेऊन आल्यानंतर त्याने दोन्ही बहिणींना लस्सी पिण्यास दिली. त्यानंतर दोघी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने राहिलचे हातपाय बांधून गळा कापून तिचा खून केला. त्यानंतर तो फरार झाला आहे
दरम्यान, पोलिसांनी म्हटले आहे कि, या प्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाणार असून आरोपीने एकट्याने हे कृत्य केले नसल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच या हत्याप्रकरणात आणखी कोण कोण सामील आहे याचा देखील शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.