धक्कादायक ! 2500 रुपये द्या आणि ‘कोरोना’चा निगेटिव्ह रिपोर्ट घ्या, आरोग्य विभाग चिंतेत

पोलिसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका खासगी रुग्णालयाने 2500 रुपयात कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देण्याची ऑफर देणारा एक व्हिड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रुग्णालयाकडून सांगितलं जात आहे की, 2500 रुपयात करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात येईल ज्यावर एका सरकारी रुग्णालयाचा शिक्का असेल. हा रिपोर्ट 14 दिवसांसाठी ग्राह्य असेल. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात एफआयआर दाखल करण्यता आला आहे.

मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर एफआआयर दाखल करण्याचाही आदेश दिला. व्हिडीओमुळे मेरठमधील आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राजकुमार सैनी यांच्याकडे रुग्णालयाने दिलेल्या निगेटिव्ह रिपोर्टदेखील सादर करण्यात आला असून त्यावर प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाचा शिक्का आहे. प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक पी के बन्सल यांनी यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती आली नसल्याचे म्हटले आहे. संबंधित रुग्णालय शाह आलम यांच्या मालकीचे आहे. राजकुमार सैनी यांच्या आदेशानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शाह आलम यांनी मात्र हा व्हिडीओ खोटा असून रुग्णालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. आपण निर्दोष असून तपासात ते निष्पन्न होईल असा दावाही त्यांनी केला आहे.