रूग्णांचं ‘कोरोना’ टेस्ट सॅम्पल हिसकावून पळाले माकडं, झाडावर बसून ‘चघळली’ किट

मेरठ/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था –   कोरोना रुग्णांबाबत गैरसमज, कोरोनाची साथ, चाचण्या, त्यांची आकडेवारी, अडचणी, भीती याच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. पण आता जे घडले आहे ते तुम्ही कधीच ऐकलं नसेल किंवा पाहिलं देखील नसेल. मीरत मेडिकल कॉलेजच्या कोरोना टेस्ट लॅबमधून माकडांनी कोरोना रुग्णांची सँपल्स पळवून नेली आहेत. कोरोना टेस्ट लॅबमधील हा प्रकार कहर म्हणता येईल. दरम्यान, सॅम्पल हिसकावल्यानंतर माकडांनी ते किट झाडांच्या फांद्यांवर बसून चघळलं.

माकडांची एक टोळी मेडिकल कॉलेजच्या या परिसरात नेहमीच दिसते. इतके दिवस त्याकडे फारसं कुणी लक्ष दलं नाही. पण त्यातल्या माकडांनी आज (शुक्रवार) सकाळी कहरच केला. कोविड 19 च्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील तीन सँपल्स माकडांनी पळवून नेले. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार घडला आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

या माकडांच्या हातात अजूनही कोविड संशयित रुग्णांची सँपल्स असल्यामुळे आता ती माकडं जिथे जिथे नाचतील. तिथे तिथे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात भयंकार खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ येथील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या भागात माकडांचा सुळसुळाट आहे आणि त्यांनी यापूर्वीही या ठिकाणी हैदोस घातला असल्याचे मेरठ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रकरणी कुणाच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे माकडांच्या हाती ही सँपल्स लागली याचा तपास हॉस्पिटल प्रशासन करत आहे.