100 वर्षीय महिलेवर बलात्कार; दोषीला जन्मठेपेची शिक्षा

मेरठ : वृत्तसंस्था – एका 100 वर्षीय दिव्यांग महिलेवरील बलात्कार प्रकरणात (raping-100-year-old-woman) तीन वर्षांनंतर दोषीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे घडलेल्या या बलात्काराच्या घटनेने तेव्हा एकच खळबळ उडाली होती. विदेशी माध्यमांनीही या घटनेची दखल घेतली होती.
अंकित पुनिया असे जन्पठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने सन 2017 मध्ये मेरठमधील एका 100 वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार केला होता. यात बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला होता. सरकारी वकील निशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित महिलेच्या नातवाने खटला दाखल केला होता. तीन वर्षांनी या घटनेचा निकाल लागला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश गुल मोहम्मद मादर यांनी आरोपी अंकितला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अंकित पुनिया हा सुरक्षारक्षकाची नोकरी करत होता. गावात महिलांची छेडछाड केल्याच्या अनेक तक्रारी त्याच्याविरोधात होत्या. मात्र, या प्रकरणी पोलिसांत कोणीही तक्रार करण्याचे धाडस करत नव्हते. त्यामुळे आरोपी महिलांची छेड काढत होता. याआधी अलवरमध्येही एका 70 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.