Lockdown मध्ये गरिबांना 52 लाखांची मदत, HR मॅनेजर ठरला ‘देवदूत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादचा ४३ वर्षीय डोसपती रामू हा गरीबांसाठी काही महिन्यांपासून देवदूत ठरला आहे. लॉकडाऊन काळात आतापर्यंत डोसपती यानं स्वत:च्या पाकिटातून तब्बल ५२ लाख रुपयांची मदत केली आहे. ‘एचआर मॅनेजर’ पदावर डोसपती रामू हा एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. गरीबांना मदत करण्यासाठी त्यानं लॉकडाऊनमध्ये स्वत:चं पीएफ खातं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं रिकामी केलं. तसंच त्यानं नालागोंडा येथील जमीन देखील विकली.

डोसपती यानं त्याची पत्नी आणि दोन मुलांसह मोठ्या फ्लॅटमध्ये जाण्याचं स्वप्न देखील पणाला लावलं आहे. डोसपतीच्या या दानशूरपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. डोसपती यानं लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी चोवीसतास ‘Rice ATM’ची संकल्पना राबवली. या माध्यमातून गरीबांना मोफत तांदूळ देण्याचं काम डोसपती यानं केलं आहे. या संकल्पनेला १९ डिसेंबर रोजी २५० दिवस पूर्ण झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजचं जेवण देखील मिळणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे समाजाप्रती काहीतरी करण्याची जाणीव निर्माण झाली आणि यातूनच सारं पुढे घडत गेलं. मला फक्त तांदळाची मदत करायची नव्हती. कारण त्यावेळी गरीबांना औषधं, दूध, भाज्या अशी इतर वस्तूंचीही गरज होती. यासर्व गोष्टी माझ्या क्रेडीट कार्डमधून मिळवणं शक्य नव्हतं. मी माझ्या कंपनीत गेल्या १६ वर्षांपासून काम करत असल्यानं पीएफमधून मला ५ लाख रुपये काढता आले. यातून मी इतर सर्व गोष्टी विकत घेऊ शकलो आणि लोकांपर्यंत पोहोचवू शकलो”, असं डोसपती भावूक होऊन सांगतो.

डोसपती रामू याचा त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या पाच महिन्यांपूर्वी दुचाकीवरुन अपघात झाला होता. त्यातून तो बचावला आणि आपल्याला मिळालेल्या नव्या आयुष्यात गरिबांची मदत करण्याचं त्यानं ठरवलं. अपघातातून सावरल्यानंतर त्यानं अनेक जागरुकता मोहीमेतही सहभाग घेऊन हेल्मेट आणि सीटबेल्टचं महत्व पटवून देण्याचे प्रयत्न केले. इतकंच नाही, तर शहरात रहदारीच्या रस्त्यांवर जास्तीत जास्त सीसीटीव्ही बसविण्यासाठीही त्यानं पुढाकार घेतला आहे. आपल्या मासिक वेतनामधून एकूण ७० टक्के रक्कम गरजूंच्या मदतीसाठी वापरायची असं त्यानं ठरवलं होतं.डोसपती याची पत्नी एका शाळेत शिक्षिका आहे. त्यानं केलेल्या कामाचं श्रेय तो आपल्या पत्नीला देतो. पत्नी माझ्यामागे खंबीरपणे उभी राहिली म्हणून मी हे करु शकलो, असं डोसपती रामू सांगतो.