जाणून घ्या NASA ची ऐतिहासिक मोहिम यशस्वी करण्यात महत्वाचं योगदान देणार्‍या डॉ. स्वाती मोहन कोण आहेत

पोलिसनामा ऑनलाईन – मंगळ ग्रहावर सात महिन्यांपूर्वी पाठविलेले ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरचे यशस्वीरित्या लँडिंग झालं आहे. २९.५५ कोटी मैलचे अंतर कापून भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजून २५ मिनिटांनी हे पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळाच्या भूमीवर उतरलं असून अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मंगळावर पर्सिव्हरन्स रोव्हर उतरताच नासाच्या कॅलिफोर्नियातील जेट प्रपल्सन लॅबोरेटरीमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर पाठविण्यात आलं आहे.

नासाच्या या ऐतिहासिक कामगिरीमध्ये भारतीय-अमेरिकन डॉ. स्वाती मोहन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अंतराळ विश्वातील अत्यंत महत्त्वाचं कार्य म्हणजे एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागावर रोव्हर लँडिंग करणं हे असून डॉ. स्वाती मोहन या संपूर्ण विकास यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. मंगळावरील टचडाऊनची माहिती मिळाली आहे. आता तिथे जीवसृष्टीचा वेध घेण्याचं काम सुरू करण्यास तयार असल्याचं डॉ स्वाती यांनी म्हटलं आहे. हे ऐतिहासिक लँडिंग संपूर्ण जग पाहत असताना स्वाती या कंट्रोल रुममधून जीएन अँड सी सबसिस्टम आणि संपूर्ण प्रोजेक्ट टीम यांच्याशी समन्वय साधत होत्या.

मोहिमेत डॉ स्वाती महत्पूर्ण भूमिका बजावत असून मुख्य सिस्टम इंजिनिअर बरोबरच आपल्या टीमची काळजी घेतात. त्याचबरोबर GN & C साठी मिशन कंट्रोल स्टाफिंग शेड्यूल देखील त्या करत असतात. एक वर्षाच्या असताना स्वाती या भारतातून अमेरिकेत गेल्या. त्यामुळे त्यांचं बालपण अमेरिकेतच गेला. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम ‘स्टार ट्रेक’ पाहिली. त्यानंतर त्यांना याबाबत कुतूहल निर्माण झालं. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांना बालरोगतज्ञ व्हायचं होतं. कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये विज्ञान विषयात स्वाती यांनी पदवी संपादन केली आणि एरोनॉटिक्स / एस्ट्रोनॉटिक्समध्ये एमआयटीमधून एमएस आणि पीएचडीही पूर्ण केली आहे.

नासाच्या विविध महत्त्वाच्या अभियानाचा डॉ. स्वाती मोहन या एक भाग आहेत. भारतीय-अमेरिकन वैज्ञानिकांनी कॅसिनी (शनी मिशन) आणि ग्रील (चंद्राकडे उड्डाण करणारे अवकाशयानांची जोड) प्रकल्पांवरही काम केलं आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले आहे.

नासाने फोटो केले शेअर
मंगळावर पोहोचलेल्या रोव्हरचा फोटो नासाने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून त्याला छानसे कॅप्शनही दिली आहे. “Hello, world. My first look at my forever home.” असं या कॅप्शनमध्ये म्हंटल आहे. त्याचबरोबरर रोव्हरच्या दुसऱ्या बाजूचा फोटोही नासाने शेअर केला आहे. पर्सिव्हरन्स रोव्हरमध्ये २३ कॅमेरे लावण्यात आले असून या कॅमेऱ्यातून आवाज आणि व्हिडिओ रेकोर्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन मायक्रोफोन्सही लावले आहेत. पर्सिव्हरन्स रोव्हरसह दुसऱ्या ग्रहावर जाणारे पहिले हेलिकॉप्टर Ingenuity देखील आहे. जेजेरो क्रेटरला पर्सिव्हरन्स रोव्हर दोन वर्षापर्यंत एक्सप्लोर करेल. पर्सिव्हरन्स हा कमांड सेट आहे. मात्र, पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची टीम त्याला मंगळावर चालण्यास, डोंगराळ भागावर लेझर लाइट मारण्यास, नमुने जमा करण्याआधी मार्गदर्शन करेल. जेजेरो क्रेटर मंगळावरील प्राचीन तलावाचा तळ समजला जातो. मंगळावर कधीतरी जीवसृष्टी असणार. त्याचे संकेत येथील जीवाश्मातून मिळण्याची शक्यता आहे.