भाजपच्या ‘पराभूत’ आमदारांच्या विखेंसोबतच्या समझोत्यासाठी मुंबईत बैठक !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आ. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे या पिता-पुत्रांमुळे आम्ही विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो, असा आरोप पराभूत आमदारांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा भाजपात सध्या विखे पिता-पुत्र पूर्णपणे एकाकी पडले आहेत. त्यांच्यात समझोता करण्यासाठी मुंबईत लवकरच बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजप मध्ये डॉ. सुजय विखे यांनी प्रवेश करून विजय मिळवला होता. त्यानंतर तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. नगर जिल्ह्यामध्ये बारा विरुद्ध शून्य अशी घोषणा खासदार सुजय विखे यांनी करुन निवडणुकीमध्ये रणशिंग फुकले होते. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना मोठा फटका बसला. माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह दिग्गज आमदारांचा पराभव झाला आहे.

 माजी पालकमंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड अशा दिग्गजांचा नगर जिल्ह्यामध्ये पराभव झाला. या घटनेनंतर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात आढळून आला.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या नेतृत्वाखाली पराभूत झालेल्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विखे पिता-पुत्र बाबत तक्रार केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/